अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला साडेतीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे.
अंकुश सोपान बर्डे (रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एप्रिल 2018 मध्ये बर्डे व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून राहुरी तालुक्यातील एका व्यक्तीच्या घरातून अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.
यानंतर त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपी गेल्या साडेतीन वर्षांपासून पसार होता.
पोलीस पथक पसार आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी बर्डे राहुरी बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने आरोपी बर्डे याला अटक करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी बर्डे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल आहे.