अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- प्रेमसंबंध असताना लग्नास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली होती. आता याच प्रकरणातील आरोपीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश बाळू गायकवाड (रा. सिव्हील हाडको) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश विरोधात विनयभंगसह रिक्षा जाळपोळ केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, आकाश याचे त्याच्या नात्यातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते.
22 जूनच्या रात्री आकाश याने पिडीत मुलीच्या घरी जाऊन तीच्या वडिलांकडे लग्नासाठी मागणी केली होती. लग्न करण्यास नकार दिल्यानंतर आकाश याने मुलीच्या वडिलांची घरासमोरील रिक्षा पेटून दिली होती.
तसेच आकाशने त्या मुलीचा विनयभंग केला होता. मुलीच्या वडिलांना मारहाण देखील केली होती. याप्रकरणी आकाश विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी आकाश गायकवाड याचा उपनिरीक्षक मेढे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शोध घेऊन त्याला अटक केली.