अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अनैतिक संबंधाला विरोध करतो या कारणावरून विकास इंद्रभान पवार याला मारहाण करून खुन करणाऱ्या प्रियकर विशाल प्रदीप तोरणे (रा. पढेगाव) याला अति. जिल्हा सत्र न्यायाधीश महमंद नासीर एम. सलीम यांनी जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर सबळ पुराव्याअभावी पत्नी मनिषा पवार हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे दि. 05/04/2018 रोजी रात्री त्याचा भाऊ विकास इंद्रभान पवार हा त्याची बायको मनिषा विकास पवार ही आरोपी विशाल प्रदिप तोरणे याच्या घरी आहे किंवा काय हे पाहाण्यासाठी गेला.
त्यावेळेस विशाल प्रदिप तोरणे व मनिषा विकास पवार या दोघांनी त्यांच्या अनैतिक संबंधास मनिषा हिचा पती विकास पवार हा विरोध करतो म्हणून त्यास लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण करुन त्याचा खून केला.
याप्रकरणी अण्णासाहेब इंद्रभान पवार, रा. पढेगाव यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विशाल प्रदिप तोरणे व मनिषा विकास पवार या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने आरोपी विशाल प्रदीप तोरणे यास जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. तसेच मयत विकास याची पत्नी मनिषा हिच्याविरोधात कुठलाही साक्षीपुरावा नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.