अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकीय आरक्षणासंबंधी इतर मागासवर्गीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऍड.संदीप ताजने यांनी शहरात आयोजित संवाद यात्रेच्या कार्यक्रमात केला. ओबीसींची बोळवण करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेशाची शक्कल लढवली आहे.
पंरतु या अध्यादेशानंतर देखील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या 10 ते 12 टक्के जागा कमी होतील. ओबीसी आरक्षणावर हा तोडगा नसून समाजबांधवांची थट्टा असल्याचे ऍड. ताजने म्हणाले. शहरातील सर्जेपुरा येथे रहेमत सुलतान सभागृहात बहुजन समाज पार्टीच्या संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. ताजणे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश सचिव पंडित बोर्डे, वरिष्ठ नेते मुकुंद सोनोवणे, जिल्हा सचिव बाळासाहेब आव्हारे, संजय डहाणे, सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जीतू साठे, सुनील मगर, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण काकने, सचिव बाळासाहेब मधे आदी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ऍड. ताजने म्हणाले की, स्थानिक स्वराज संस्थेतील आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. अशात आंधप्रदेश आणि तेलंगणाच्या धर्तीवर 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत ओबीसी वर्गाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधी अध्यादेश आणण्याची राज्य सरकारची तयारीत आहे. या मर्यादेनंतर ओबीसींची 10 ते 12 टक्के जागा कमी होतील. पंरतु 90 टक्के जागा वाचतील, असा सरकारचा दावा आहे.
इतर मागासवर्गीयांचे फार नुकसान होवू दिले नाही, असा टेंभा सरकार मिरवतांना दिसून येत आहे. हा निर्णय केवळ फार्स असून ओबीसी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचे ते म्हणाले. ओबीसींना पुर्ववत राजकीय आरक्षण मिळावे, या बाजूने बसपा आहे.
अखेरपर्यंत बसपा ही मागणी लावून धरेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी सह सर्व समाजाचे हित बसपात सुरक्षित आहे. अशात महाविकास आघाडीला ओबीसींच्या हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडू,असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी सुनिल शेजवळ यांनी बसपात प्रवेश केला.
शेजवळ याच्यासह शेवगावचे प्रविण मगर, पद्माकर चव्हाण, धनंजय दिंडोरे, सुनिल देठे, बाळासाहेब श्रीराम, सुलेमान शेख, अजित भोसले यांनी बसपात प्रवेश करीत पक्ष संघटना मजबुत करण्याचा संकल्प केला. बसपाकडून काढण्यात आलेली संवाद यात्रा खेड्यापाड्यापर्यंत पोहचत आहे.
यावेळी सरकारविरोधातील नाराजी जनता जाहिर प्रकट करीत आहे. म्हणून सर्वसमोवश आणि सर्व हितकारक पक्ष केवळ बसपाच आहे. अशात सर्वजन सुख-सर्वजन हित आणि समाजकारण या त्रिसुत्रावर बसपा आगामी निवडणुका लढवणार आहे. सरकारकडून काढण्यात येणार्या अध्यादेशानंतर ओबीसींचे आरक्षण 27 टक्क्याहून कमी राहील.
यात पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार मध्ये 15 टक्के, यवतमाळ 17 टक्के, गडचिरोली 17 टक्के, चंद्रपुर 19 टक्के, रायगड 19 तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये 27 टक्के आरक्षण मिळेल. पंरतु,ओबीसी बांधवांच्या संख्येनुसार त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या नैतिक जबाबदारीपासून सरकार पळ काढू शकत नसल्याचे ऍड. ताजने यांनी संवाद यात्रेत स्पष्ट केले.
राज्य प्रभारी प्रमोद रैना म्हणाले की, प्रमुख नेत्यांच्या प्रवेशाने बसपाला बळ मिळाले आहे. संवाद यात्रेदरम्यान विविध जिल्ह्यांमधील प्रमुख नेते बहन मायावतीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होवून बसपात प्रवेश करीत आहे. या नेत्यांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाने पक्षसंघटना अधिक बळकट होणार आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने पक्ष विस्ताराच्या कामाला लागण्याचे त्यांनी आवाहन केले.