अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नेवासा शहरात मास्क न घालणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. अजून कोरोना गेलेला नाही, नियमांचे पालन करा, असे आवाहनही नगरपंचायतच्या टीमकडून करण्यात येत होते.
मास्क नसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिकारी गुप्ता, वाघमारे, कडपे, कार्यालयीन कर्मचारी मनिषा मापारी, अनिता सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नेवासा शहरात फेरफटका मारून ही कारवाई केली.
नेवासा शहरात बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांसह व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनादेखील मास्क नसतो, हे निदर्शनास आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा शहरात वाढू नये, म्हणून सायंकाळच्या सुमारास नगरपंचायतच्या टीमने नेवासा शहरातील मुख्य पेठेसह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड, नगरपंचायत चौक,
बाजारतळ परिसर, एस.टी. स्टँड परिसर, श्रीरामपूर रोड याठिकाणी फेरफटका मारून मास्क न घालणाऱ्या व्यक्ती तसेच दुकानातील काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. कोरोना रुग्णांचा आकडा नेवासा शहरासह तालुक्यात कमी होत असला तरी खरेदीसाठी येणाऱ्या बाहेरील लोकांची संख्या अधिक असल्याने मास्क न घालणाऱ्यांवर ही कार्यवाही करण्यात आली.
रोज याच पद्धतीने फेरफटका मारुन ही दंडात्मक कारवाई आम्ही करतच रहाणार आहोत. नागरीकांनी मास्क घालूनच कामासाठी बाहेर पडावे व शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन गर्कळ यांनी केले आहे.