अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोपरगावात १ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये ८७७ जणांवर मास्क परिधान न केल्याप्रकरणी कारवाई केली.
त्यामध्ये पोलिसांनी २ लाख ५६ हजार ७०० रुपये इतका दंड वसुल केला आहे. मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढण्यास सुरूवात झाली.
त्यामुळे पालिका,आरोग्य व पोलीस प्रशासनाकडून नागरीकांना मास्क परिधान करण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यास सुरू केले.
पण काही नागरीकांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एवढेच नाही, तर मास्क न परिधान न करता फिरणाऱ्या लोकांच्या अशा बेशिस्तपणाचा फटका थेट कोपरगावकरांच्या जीवावर उठत आहे.
अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात कोपरगावकरांना मोठया जीवघेण्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भिती आहे.
एकीकडे प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड करीत असताना, दुसरीकडे अनेक नागरीक मास्क परिधान करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची सद्यस्थिती आहे.
अशा नागरीकांवर शहर पोलीस ठाणे व वाहतुक पोलिसांकडून दररोज नाईलाजाने दंडात्मक कारवाई केली जात आहे.
दंडात्मक कारवाई पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून आपल्या जबाबदारीचे भान बाळगले पाहिजे.
स्वत:च्या आरोग्यरक्षणाला प्राधान्य देण्यासाठी नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
कोपरगाव शहर पोलिसांनी मागील वर्षी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो जणांवर कारवाई केली होती.
त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला होता. त्याच बरोबर कायद्याची एक दहशत सुद्धा निर्माण केली होती.