अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असल्याने,
कोपरगाव पालिकेने कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवत गुरुवारी (ता.१) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ दुकाने, ३ हातगाडे आणि एक दुकान सील करत ६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दुसरी लाट ओसरल्याने सरकारने निर्बंध शिथील केले होते. परंतु अनलॉकच्या नावाखाली सर्रासपणे कोविड नियमांचे व्यापारी व नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर कोपरगाव पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार सलग कारवाई करत गुरुवारी १२ दुकाने, ३ हातगाडे यांच्यावर दंडात्मक कारवाई करून साईबाबा शॉपिंग सेंटर मधील कोपरगाव ऑटो इलेक्ट्रीक हे दुकान सील करण्यात आले आहे.
या कारवाईत ६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याने नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.