अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांकडून कुणी जास्त बिले वसूल करत असेल, तर नातेवाईकांनी तक्रार करावी, असे दवाखाने व लॅब्जवर गुन्हे दाखल करू, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.
राहाता तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल शिर्डीत स्वत: फिरून शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅबमध्ये जाऊन तपासणी केली.
सर्वांना शासकीय अटी व शर्तीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचनाही दिल्या. कोणत्याही खासगी लॅबमध्ये तपासणी करताना किंवा दवाखान्यामध्ये कोणी ठरवून दिलेल्या बिलापेक्षा रुग्णांकडून जादा आकारणी केली,
तर तशी तक्रार संबंधित रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी करावी, त्या दवाखान्यावर किंवा लॅबवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही हिरे यांनी सांगितले.राहाता तालुक्यामध्ये सहा ठिकाणी खासगी १०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
खासगी दवाखान्यात रुग्णांकडून अधिक बिले आकरू नयेत, त्याचप्रमाणे खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी अतिरीक्त पैसे घेऊ नयेत, शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणेच बिलाची आकारणी करावी, अन्यथा अशा खासगी दवाखाने किंवा लॅबवर सक्त कारवाई करण्यात येईल,
असाही इशारा हिरे यांनी दिला आहे. राहाता तालुक्यातील सर्वच ठिकाणी व शिर्डी शहरातही हॉटेल, लॉज व रेस्टॉरंट यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावयाचे आहे. नागरिकांनी बाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे,
तसेच सामाजिक अंतर ठेवले पाहिजे, दुकानदारांनी मास्क वापरणे गरजेचे आहे, अन्यथा दुकानदारांवरही दुकाने बंद करण्यासारखे पाऊल उचलले जाईल. रात्री आठनंतर सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी आदेश लागू आहेत.
पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, तसेच लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर समारंभासाठी गर्दी करू नये. राहाता तालुक्यातील सर्व नागरिकांनी अटी व शर्तींची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे.
अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा हिरे यांनी दिला आहे.