आदिवासींच्या जमीनी बळकाविणार्‍या वांगदरीच्या माजी सरपंचवर कारवाई करावी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  आदिवासींच्या जमीनी बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील माजी सरपंचवर कारवाई होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने गावातील आदिवासी बांधवांनी काळी आई मुक्तीसंग्राम जारी केला आहे.

माजी सरपंचाचा राजकीय वरदहस्त असल्याने आदिवासी समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री, महसुलमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील माजी सरपंच महेश नागवडे आदिवासी भिल्ल समाजाच्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून ताब्यात असलेल्या जमीनी बळकावत आहे.

वांगदरी येथील गट नंबर 255 मधील 4 हेक्टर 22 आरपैकी चार एकर जमिनीवर माजी सरपंचाने शेततळे उभारुन मशागत सुरू केली आहे. तर आदिवासींना विस्थापित करण्यासाठी दंडेलशाही सुरू केली असल्याचा आरोप आदिवासी समाजबांधवांनी केला आहे. वांगदरी ग्रामपंचायतने 2 ऑक्टोंबर 2008 रोजी ठराव क्रमांक चार अन्वये वननिवासी कायदा 2006 मधील तरतुदीनुसार सदर जमीनीवर भिल्ल समाजाचे ताबे व वहिवाट कायम करणे बाबतचा ठराव केला होता.

त्या ठिकाणी पंधरा भिल्ल कुटुंब राहतात. याच गटातील पड जमीन 3 हेक्टर 85 आर वर राज्य सरकारने 85 बेघरांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जागा मंजूर केली आहे. या जमिनी बळकावून आदिवासी भिल्ल समाज बांधवांना विस्थापित करण्याचे काम धनदांडग्यांनी चालवले असल्याचे संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

आदिवासींच्या जमीनी बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या माजी सरपंचावर कारवाई करुन आदिवासी भिल्ल समाजबांधवांना न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

काळी आई मुक्तीसंग्रामसाठी हनुमंत बाळू गायकवाड, निवृत्ती बाळू गायकवाड, किसन दगडू बर्डे, बाळू दगडू बर्डे, गोकुळ बाळू गायकवाड यांच्यासह आदिवासी भिल्ल समाज बांधवांनी पुढाकार घेतला आहे.

Ahmednagarlive24 Office