नागापूरच्या स्मशानभूमीत मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करणार्‍यावर कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- नागापूर येथील कैलास स्मशानभूमी मध्ये स्थानिक नागरिक दहन नोंदवहीमध्ये मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करत असल्याची तक्रार नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने केली असून,

सदर व्यक्तीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय व नगर तहसीलदार यांना असोसिएशनच्या अध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी दिले आहे.

नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने कैलास स्मशानभूमीची देखरेख केली जाते. असोसिएशनच्या माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य नागरिकांना अल्पदरात उपलब्ध करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. असोसिएशनच्या वतीने स्मशानभूमीच्या भोवती झाडे लाऊन या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे काम पाहिजे जात आहे.

संरक्षण भिंतीच्या डागडुजीचे काम करुन रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना हात-पाय धुण्यासाठी पाण्याची टाकी व रक्षा टाकण्याची व्यवस्था असोसिएशनने करुन दिली आहे. तसेच अंत्यविधीनंतर रक्षा पैठण, गंगा-गोदावरी या ठिकाणी विसर्जित करण्याचे काम असोसिएशनच्या वतीने विनामुल्य केले जात आहे.

प्रत्येक अंत्यविधीची नोंदवही मध्ये संपुर्ण माहिती नोंदवून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र या कामाला स्थानिक नागरिक असलेले रमेश सप्रे विरोध करीत असून, स्मशानभूमीत असलेल्या नोंद वहीत मृतदेहाची नोंद न करता, त्याची परस्पर विल्हेवाट लावत असल्याचा आरोप नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.

सदर व्यक्ती मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करत असून, अंत्यसंस्कार सुरु असताना त्या ठिकाणी न थांबता निघून जातो. मयताच्या शरीराचे काही भाग तसेच राहत असून, असोसिएशनचे सदस्य अशा व्यक्तींचे अंत्यविधी पुर्ण दहन होण्यासाठी देखील सहकार्य करत आहे.

अशा पध्दतीने स्थानिक व्यक्ती मृतदेहाची विटंबना करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करणार्‍या स्थानिक नागरिकावर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.