अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शिर्डीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत शिर्डीत वाढत असलेली गुन्हेगारी व अवैद्य व्यवसायाविषयी नाराजी व्यक्त करून गुन्हेगारी व अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
याची दखल घेत शिर्डीत काल सायंकाळी पोलिसांनी शेळके कॉर्नर समोर दिवसा ढवळया व रात्री भर चौकात बंद दुकानांसमोर बसून काही महिला अश्लील हावभाव करीत असलेल्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस नाईक अविनाश मकासरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.
यातील महिला या सार्वजनिक ठिकाणी उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातवारे इशारे करून असभ्य वर्तन करत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर वरील कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे फिर्यादीत पोलीस नाईक मकासरे यांनी म्हटले आहे.
पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे. तसेच ९ जुन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ठिकाणी छापे टाकुन विना परवाना दारु विक्री करत असलेल्या निमगाव कोऱ्हाळे गावातील नानासाहेब भानुदास चव्हाण याला पोलिसांनी पकडले.
तर शिर्डी शहरात अक्षय सुधाकर चव्हाण यांच्या कडुन ६०० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलीस नाईक विशाल दळवी, संदिप चव्हाण, गणेश सोनवणे, डि. व्ही. पवार यांनी भाग घेतला.