अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला.
हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले. राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचं पत्रं असल्याचं पोलिसांना माहीत नव्हतं.
सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्रं दाखवलंही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं.
मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला.
शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.
यावेळी ब्रुक फार्माच्या मालकाला का बोलावलं? कशासाठी बोलावलं? असा सवाल करण्यात आला. पोलिसांना कुणालाही बोलावण्याचा अधिकार आहे. कुणाचीही चौकशी करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं.