सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर आता राजकीय आखाड्यात उतरणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- आपल्या अदांनी, निखळ सौंदर्याने चित्रपट रसिकांना घायाळ करणारी आणि प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री वर्षा उसगावकर आता राजकीय आखाड्यात उतरणार आहेत.

पुढच्या वर्षी गोव्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे गोव्यात राजकीय घडामोडींना उधाण आलेले असताना वर्षा उसगावकर या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तृणमूल काँग्रेसकडून वर्षा यांच्यावर मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचे बोलले जाते. ममता येत्या 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यावेळीच वर्षा उसगांवकर तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना राजकीय वसाही लाभला आहे, त्या एका राजकीय कुटुंबातील आहेत.

त्यांचे वडील अच्युत के. एस उसगांवकर हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते. ते गोवा विधानसभेचे उपसभापती आणि एकापेक्षा जास्त वेळा मंत्रिमंडळाचे सदस्य होते.

मंत्री होण्यापूर्वी अच्युत उसगांवकर यांनी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वात सरकार असताना गोव्याचे उपसभापती म्हणून काम केले. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणीच मिळाले आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

वर्षा उसगावकर यांनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली असली, तरी त्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर गोव्यातीलही प्रसिद्ध चेहरा आहेत.

गोव्यात 75 % हिंदू मतदार आहेत. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या रुपाने हिंदू चेहरा समोर आल्यास, गोव्यात तृणमूल काँग्रेसला फायदा होईल, असे बोलले जाते.

Ahmednagarlive24 Office