अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-जिल्ह्यातील अकोले सारख्या दुर्गम भागात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. अकोल्यातील रुग्णांना संगमनेर, लोणी, नाशिक, नगर येथे जाऊन एचआरसीटी स्कॅन करावा लागतो.
यात रुग्णांना प्रवास, वेळ आणि आर्थिक त्रास होतो. दरम्यान अकोले तालुक्यात कोरोनामुळे प्राणास मुकणार्या जनतेसाठी आता भुमीपुत्र असणार्या वरिष्ठ अधिकार्यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत.
अजित देशमुख, वजय चौधरी, संजय देशमुख या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी अकोले तालुक्यात सी. टी. स्कॅन व सी. आर. सिस्टीम मंजूर करणेसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लेखी मागणी करून विनंती केली आहे.
यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ह्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेत हेल्थ कमिशनर यांना पुढील कारवाईचे आदेश दिले. अकोले तालुक्यातील 191 गावांमध्ये 7 लाख इतकी लोकसंख्या आहे.
तालुका आदिवासी बहुल लोकसंख्येचा आणि डोंगराळ असल्याने दळणवळण आणि आरोग्य सुविधा मिळणे अडचणीचे आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीत रुग्णांना सी.टी.स्कॅन व डीजिटल एक्स-रे संगमनेर किंवा लोणी शिवाय सुविधा उपलब्ध नाहीत.
तालुक्यातील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी अकोले, कोतुळ, राजुर, समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात सी.टी.स्कॅन व सी.आर.सिस्टिम त्वरीत उपलब्ध करून देण्याची विनंती अजित देशमुख, विजय चौधरी आणि संजय देशमुख या प्रशासकीय अधिकार्यांनी केली आहे.