अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर अहमदनगर जिल्ह्याचा दिल्ली येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री श्री.तोमर व केंद्रीय राज्य मंत्री चौधरी,
महाराष्ट्र राज्याचे दादासाहेब भुसे यांच्या हस्ते नगरचे जिल्हाधिकारी नगर डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, सन २०१९ पासून तिची अंमलबजावणी सुरु झाली.
केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार विहित कालावधीत पीएम किसान सन्मान योजनेची कार्यवाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्या दिशानिर्देशात सुरुवातीच्या काळात झाली होती.
कुळ कायदा शाखेचे तत्कालीन तहसीलदार फसियुद्दीन शेख, शरद घोरपडे यांच्या नियोजनात पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाची पायाभरणी झाली.
तसेच जिल्ह्यातील ग्रामस्तरीय समितींच्या सदस्यांना असणाऱ्या शंकाकुशंकांचे निरसन होण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. नंतरच्या काळात विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निर्देशात पीएम किसानचे काम पथदर्शी पध्द्तीने सुरु राहिले.
कुळकायदा शाखेच्या तहसीलदार सुनिता जऱ्हाड, नायब तहसीलदार वरदा सोमण,अव्वल कारकून संदेश दिवटे, आयटी असिस्टंट रोहित शिंदे यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांच्या टीम वर्क मुळे या योजनेत नगर जिल्ह्याचे काम राज्यात नव्हे तर देशात अव्वल राहिले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत सर्वच्या सर्व 28802 लाभार्थींची म्हणजे 100 टक्के तपासणी पूर्ण केली. यासह देशात उल्लेखनीय काम केले म्हणून अहमदनगर जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 1.14 कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली आहे. आतापर्यंत साधारण 1.05 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 11633 कोटी रुपये जमा झाले आहेत.