अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- आपल्या समाजातील मोठंमोठी लग्ने आपण बर्याचदा पाहिली किंवा ऐकली असतील, विशेषत: मोठ्या सेलिब्रिटींचे विवाह त्यांच्या लग्जुरियस असण्याने नेहमीच चर्चेत असतात.
पण सर्वसामान्यांसाठी आदर्श निर्माण करत मध्य प्रदेशातील दोन अधिकाऱ्यांनी केवळ 500 रुपयात लग्न करून दाखवले. अनावश्यक खर्चास फाटा देत केलेलं हे लग्न एक उत्तम उदाहरण बनले आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका कोर्टात शहर दंडाधिकारी शिवांगी जोशी आणि लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या अनिकेत चतुर्वेदी यांचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून एकूण मिळून ५ ते १० लोकच उपस्थित होते
आणि लग्नासाठी केवळ वरमाला व मिठाईची व्यवस्था करण्यात आली होती. इतर कोणथाही थाटमाट करण्यात आला नव्हता. दोघांनही ठरलेल्या वेळेनुसार आपल्या वाहनातून कोर्टात पोहोचले आणि विवाह नोंदणी केली.
कुटुंबियांच्या उपस्थितीत वर-वधूनं एकमेकांना वरमाला घातल्या आणि कोर्टातच दोघांचा शुभमंगल सोहळा पार पडला. लग्नानंतर कोर्टात उपस्थित अधिकाऱ्यांनीही जोडप्याला आशीर्वाद दिले. न्यायाधीश शिवांगी जोशी मूळच्या भोपाळच्या रहिवासी आहेत.
शिवांगी यांचा विवाह मेजर अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी दोन वर्षांआधीच ठरला होता. पण कोरोनामुळे वारंवार मुहूर्त टळत होता. मेजर अनिकेत सध्या लडाखमध्ये तैनात आहे. तर शिवांगी यांची नियुक्ती धार जिल्ह्यात आहे.
कोरोना काळात शिवांगी ड्युटीमध्येच व्यग्र होत्या. त्यामुळे लग्नासाठी सुट्टी घेणं काही जमत नव्हतं. अखेर कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीनं विवाह उरकण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्या कुटुंबीयांनाही यास मान्यता दिली आणि कोर्ट परिसरात कोणताही थाटमाट किंवा बँडबाजा, वरात न करता दोघं विवाह बंधनात अडकले.
विवाहसोहळ्यांमध्ये अवास्तव खर्च करण्यात शौर्य नाही :- सिटी मॅजिस्ट्रेट शिवांगी जोशी यांना या लग्नातून अनेक संदेश द्यायचा होता. सर्वप्रथम, लग्नामधील हुंड्यासारख्या वाईट प्रथा थांबविण्याचा संदेश त्यांना द्यायचा होता.
तसेच लोकांना हे देखील समजावून सांगायचे होते की लग्नात अवाढव्य खर्च करणे हे शौर्य नाही, याने पैशाचा गैरवापर केला जातो, त्या पैशांचा उपयोग या उधळपट्टीपेक्षा एखाद्या महान कार्यात खर्च करणे चांगले.