अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन मोठा गदारोळ झाला. काल राज्यभर नारायण राणेंच्या विरोधात आंदोलने झाली.
अखेर दुपारच्या सुमारास राणेंना अटक करण्यात आली. त्यानंतर उशिरा रात्री उशीरा त्यांना मिळालेला जामीन या फिल्मी स्टाईलने राजकीय घडामोडी घडल्या.
रायगड कोर्टाकडून नारायण राणेंना जामीन मिळाला असला तरी हे राजकीय वादळ शांत झालेलं नाही आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना घेऊन पोलीस पावणेदहा वाजता न्यायालयात पोहोचले.
त्यानंतर तब्बल एक तास या प्रकरणाची सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाबाहेर उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. भाजपचे कार्यकर्ते फुल टेन्शनमध्ये होते.
न्यायमूर्ती आपला निकाल काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रथम न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर रात्री 10.50 वाजता आपला निकाल दिला.
राणेंना पोलीस कोठडीची गरज नाही म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येत आहे, असा निकाल न्यायदंडाधिकाऱयांनी दिला.
त्यानंतर राणेंच्या वकिलांनी तत्काळ त्यांच्या जामीनाचा अर्ज दिला. या जामीन अर्जावर नंतर तब्बल अर्धा तास सुनावणी झाली आणि राणेंना मोठय़ा धाकधुकीनंतर न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांनी जामीन मंजूर केला. सगळय़ा प्रक्रिया पूर्ण करून राणे यांना कोर्टाबाहेर पडण्यास रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते.