मुंबई : सतत मनसे (Mns) व राष्ट्रवादी (Ncp) युतीच्या चर्चा येत असताना आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या युतीला पूर्णविराम दिला असून मनसे व राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र चांगलाच टोला लागावला आहे.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले असते का? असे म्हणत या युतीतील चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
तसेच राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे. भाजपने (Bjp) तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिलेली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल.
योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे, असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, यावेळी भोंग्याच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपलाही फटकारले. इतके वर्ष सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते? आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.
भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.