अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
परमबीर यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. देशमुख यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी सरकारला महिनाभरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
नगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी कालपासून आरोपांचा धडाका लावला आहे. पुढचा मंत्री काँग्रेसचा, असा त्यांचा दावा आहे. आता राज्यातील वातावरणाचा फायदा उठवत विखे यांनी महसूल खात्यातील वाळूचा विषय पुढे करून थोरात यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले आहे.
वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यासंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा भाजपचे नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी केला आहे. सात दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर उपोषण करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही आपल्यासमवेत उपोषणात सहभागी व्हावे, असे आव्हानही विखे यांनी दिले आहे. नाव न घेता त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या मुद्द्यावरून टार्गेट केल्याचे दिसून येते.
पहिल्यांदा शिवसेनेचा मंत्री गेले, आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री व पुढचा नंबर काँग्रेसच्या मंत्र्यांचा आहे. ही राजीनाम्याची साखळी अशीच सुरू राहणार आहे. कोणी पैसे खाल्ले, कोणाकडून खाल्ले, किती वाळू उपसली जाते.
कोण कोणाला संरक्षण देतं, याचं सगळं घबाड माझ्याकडे आहे. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर देणारच आहे. पण संसदेत आणि विधिमंडळातही यावर आवाज उठविणार आहे. त्यानंतर दिसेल कोणाची विकेट पडते ते.
यात आमच्यासोबत कोणी पूर्वी काम केलेले असतील त्यांनाही सोडणार नाही.असे सुजय विखे म्हणाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे.
तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही केली गेली आहे. याशिवाय भाजपच्या अनेक नेतेमंडळींकडून सरकार अस्थिर होणार असल्याची वक्तव्ये करण्यात आली आहेत.