देशमुख, परब यांच्या नंतर आता आव्हाडांचा नंबर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकार व मंत्र्यांविरोधात हल्लाबोल केला आहे. देशमुखांपाठोपाठ अनिल परब यांचा नंबर लागला आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर आहे, असे ते म्हणाले. वाझेवर कारवाई झाली, पाच अधिकाऱ्यांचे निलंबन झाले.

परमबीरसिंग यांना घरी बसावे लागेल, देशमुखांवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. हे सरकार पाच वर्ष टिकावे मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम भाजपकडून केले जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगीतले.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे आरोप करण्यात आल्याने ते गोत्यात आले आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नती अर्थात बढतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो,

असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करून चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांना पाच दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पाटील यांनी परब, ट्रान्सपोर्ट आयुक्त अविनाश ढाकणेसह पाच अधिकाऱ्यांविरोधात कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची वसुली परब यांच्या इशाऱ्यावरून केली जात होती, असा आरोप पाटील यांनी केला. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24