अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यात काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये पैसे, सोने चांदीचा ऐवज लुटल्याच्या घटना घडल्या होत्या.
मात्र आता चक्क शेतकर्याच्या गोठ्यात बांधलेल्या सुमारे एक लाख रुपये किमतींच्या दोन जर्सी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरापासून जवळच असलेल्या नेप्ती गावच्या शिवारात असलेल्या महांडूळे वस्तीवर शेखर महांडूळे यांचा गायींचा गोठा असून
महांडूळे यांचे बंधू रामदास हे शुक्रवारी (दि. 26) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायींना चारा टाकून घरात झोपण्यास गेले.
त्यानंतर शनिवारी (दि.27) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा गायींना चारा टाकण्यासाठी गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील तीन गायींपैकी दोन गायी तेथे त्यांना दिसल्या नाहीत.
याबाबत त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. याबाबत शेखर दत्तू महांडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.