कोरोना संकटानंतर सर्वसामान्यांचा आता लढा महागाईशी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता सर्वसामान्यांपुढे आता वाढत्या महागाईचे संकट उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले.

गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १२.९४ टक्क्यांवर झेपावला आहे. निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीनंतरच्या मेमध्ये तो उणे (-) ३.३७ टक्के होता.

तर एप्रिल २०२१ मध्ये तो १०.४९ टक्के नोंदला गेला होता. यंदा सलग पाचव्या महिन्यात त्यात वाढ झाली आहे. महागाईत इंधन दरवाढीचा यावेळी जवळपास दुप्पट, ३७.६१ टक्के हिस्सा राहिला आहे. इंधनाबरोबरच निर्मित वस्तूची महागाई दुहेरी अंकापर्यंत पोहोचली आहे.

अन्नधान्याच्या महागाईचा दर ४.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रामुख्याने या गटातील कांद्याच्या २३ टक्के किमतवाढीचा भार त्यावर पडला आहे. जूनमधील महागाई दर विक्रमी नसला तरी १२ टक्क्य़ांपर्यंत असेल, असा अंदाज ‘इक्रा’ वित्तसंस्थेच्या मुख्य अर्थजज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केला आहे.

भारतात व्याजदरासाठी महत्त्वाची मोजपट्टी मानला जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक यंदाच्या मेमध्ये ६.३ टक्के नोंदला गेला. गेल्या सहा महिन्यांतील हा सर्वाधिक स्तर आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीपोटी रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील अशा ४ टक्क्य़ांच्या पुढे यंदा तो पोहोचला आहे.

आधीच्या, एप्रिलमध्ये किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक ४.२३ टक्के होता. यंदा अन्नधान्याच्या किमती २ टक्क्य़ांवरून दुपटीने अधिक, ५ टक्के झाल्या आहेत.

वाढत्या महागाईपोटी रिझव्‍‌र्ह बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर कपात टाळली होती. देशात इंधन दरवाढ कायम असून, अनेक ठिकाणी पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे २९ पैशांनी, तर डिझेलच्या दरात लिटरमागे ३० पैशांनी वाढ केली. सहा आठवडय़ांतील ही २४ वी दरवाढ असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24