युवकाच्या निधनानंतर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलीस ठाण्यासमोर नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या ग्रामस्थांनी ठिय्या अंदोलन केले.

यानंतर पोलिसांनी संबंधित विहीरमालकांवर गुन्हा दाखल केला. घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचे शेत आहे. विहिरीतील मोटार काढण्यासाठी शिवाजी एकनाथ सावंत (वय २६) यास आणण्यात आले.

तो हे काम करण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मालकाने कुठलीही खबरदारी घेतली नव्हती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दि. १५ जून रोजी सकाळी घडली.

सोनई पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केलीहोती. विहीरमालकावर गुन्हा दाखल केला, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे पदाधिकारी पिराजी शिंदे, भाऊराव शेगर, दया सावंत, बाबा शिंदे, मोहन शेगर, बाबा शेगर, शिवराम सावंत,

विठ्ठल शेगर, अनिल सावंत यांच्यासह सुमारे २०० जणांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या अंदोलन केले. मृत्युमुखी पडलेल्या सावंत यांची घरची परिस्थिती अतिशय गरीबीची आहे. त्यास तीन लहान मुले असून संपुर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने सर्व समाज एकत्र आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पोलिसांनी अशोक नहार, अजय नहार, अभय नहार व त्यांच्या एका नोकरावर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24