अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- जगभरात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक ठिकाणी कोरोनाची तिसऱ्या लाटेचा प्रकोप दिसू लागला आहे. यातच अनेक ठिकाणी कठोर नियमांची अंलबजावणी देखील करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
यातच जपान सरकारने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. सध्या टोकयोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. जगभरातले हजारो खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी टोकयोमध्ये आहेत. यातच जपान सरकारने कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणीबाणी टोकयो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका आणि ओकिनावामध्ये लागू करण्यात आली आहे. या राज्यांशिवाय होक्काइडो, इशिकावा, क्योटो, ह्योगो आणि फुकुओका या प्रांतांमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत आणीबाणी लागू करण्याबाबतची घोषणा केली आहे. टोकयो आणि ओकिनावामध्ये पहिल्यापासूनच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ही आणीबाणी 22 ऑगस्टला संपणार आहे.
सरकार कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करत आहे, पण संक्रमण वाढते आहे. टोकयोमध्ये ऑलिम्पिकनंतर पॅरालिंपिकचं आयोजन करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.