अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाही बैलपोळा व गणेशोत्सवावर सावट असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सण-उत्सव अडकल्याने कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. त्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने लॉकडाउनचे संकेत दिल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात अडचणी निर्माण होताना दिसत आहे.

प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. सण-उत्सव तोंडावर आले असताना कारखानदारी अडचणीत आली आहे. बैलपोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजार पेठेत दुकाने सजली आहेत.

शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे बाजारपेठ ओस पडल्या आहेत. शेतकरी उत्साहाने बैलपोळा साजरा करतो. बैलांच्या मिरवणुकाही कोरोनामुळे निघणार नाहीत.

मात्र पारंपरिक पद्धतीने शेतकरी बैलांना विश्रांती देत त्यांचे पूजन करतील. वास्तविक यांत्रिकी शेती मुळे बैलांचे प्रमाण कमी झाले आहे. गणेशोत्सव देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे.

मूर्तीकारांनी जय्यत तयारी केली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून गणेश मूर्ती बनवल्या आहेत. शहरातील गणेश मंडळांनाही कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. या संदर्भात मंगळवारी पोलिस प्रशासनाने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली आहे.