अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. महावितरण कंपनीने शेतकर्यांकडील थकीत शेतीबिल वसुलीसाठी महावितरण कृषी योजना 2020 आणली आहे. यामध्ये थकीत शेतीविज बिल भरल्यास विज बिलात 50 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येणार आहे.
मात्र गेल्या कित्येक वर्षापासून निळवंडे लाभक्षेत्रातील जिरायती परिसराला पावसाआभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पावसाअभावी गेल्या अनेक वर्षात या जिरायती भागात विज मोटारीच ढळल्या नव्हत्या. चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिरायती भागातील पाणी पातळी वाढल्याने प्रथमच रब्बीचे गहू, मका, ज्वारी, हरभरा आदी पिके घेण्यात आली.
पिके शेवटच्या टप्प्यात व शेवटच्या पाण्यावर आलेली असताना महावितरण कंपनीने थकीत शेती बिले वसुलीसाठी वीज रोहीत्र बंद करण्याचे धोरण घेतले आहे. वीज पुरवठा बंद झाल्याने हातातोंडाशी असलेली व केवळ एका पाण्यावर आलेली रब्बीची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
दुष्काळामुळे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या विज मोटारी चांगल्या पावसामुळे चालू वर्षीच ढळल्या आहेत. महावितरणच्या पठाणी वसुलीमुळे शेतकरी संकटात आला असून महावितरणने वसुलीच्या नावाखाली वीज रोहीत्र बंद करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पिके निघाल्यानंतर वसूल केल्यास शेतकर्यांना विज देयके भरण्यासाठी किमान पिकांचे तरी उत्पन्न मिळणार आहे. मात्र विजेअभावी पिकेच जळून गेली तर पिकेही वाया जाणार असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी वीज रोहीत्र बंद करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.