अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांनी दिला.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सुखधान बोलत होते. ते म्हणाले, की नेवासा तालुक्यात वाळू, दारू, मटका, रेशनचा काळा बाजार, जुगार आदी अवैध धंदे मोठया प्रमाणात वाढले आहेत.
आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जे अवैध व्यवसाय बंद होते ते पुन्हा चालू झाले आहेत.
पोलिसांनी अवैध व्यवसायाला आळा घालून कार्यपद्धतीत बदल करावा, अन्यथा आठ दिवसांमध्ये पोलीस स्टेशनच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा सुखधान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
अवैध धंदे बंद करावेत, या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यासाठी संजय सुखधान पोलीस ठाण्यात गेले होते, त्यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी निवेदन घेण्यास नकार दिल्याचा आरोप सुखधान यांनी यावेळी केला.