अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- दूध भेसळीचे आगार बनलेल्या राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शिलेगाव (करपरावाडी) येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून भेसळयुक्त सुमारे ६०० लिटर दूध नष्ट करून, भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य पावडर व मिश्रण जप्त केले तर सदर दूध संकलन केंद्राचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचे आदेश आले आहे.
या कारवाईमुळे दुग्ध व्यवसायात खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात सध्या सर्रासपणे दूध भेसळ करण्याचा गोरख धंदा तेजीत चालू आहे.
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील करपरावाडी शिलेगाव या ठिकाणी दुधामध्ये भेसळ सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यानंतर आज अन्न व औषध प्रशासन अहमदनगरच्या पथकाने सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी गोरक्षनाथ दूध संकलन केंद्र व म्हसे पाटील दूध संकलन केंद्र या दोन ठिकाणी छापा टाकला.
सदर ठिकाणी गोठ्यामध्ये दूध भेसळीसाठी साठवलेली ११५ किलो पावडर, ४० लिटर पावडर द्रावण, व सुमारे ६०० लिटर भेसळयुक्त दूध मिळून आले या वेळी सुमारे ३७ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला
वरील ठिकाणी दोन्ही व्यवसायिक दररोज ७०० ते ७५०लिटर दूध शेतकऱ्यांकडून संकलित करून त्यामध्ये पावडरचे तयार केलेले दुध असे मिश्रण करून सुमारे एक हजार लिटर दूध पुढे विक्री करीत असत.
सदर पावडर व द्रावण यांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले असून भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केले. सदरची कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांनी सहायक आयुक्त एस.व्ही.शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
दरम्यान गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दुधाला भाव वाढल्यामुळे दुधामध्ये भेसळ करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहे. सदरच्या कारवाईचे सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले असून,
दुधामध्ये भेसळ करणारे मोठे बोके अद्याप मोकाट असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांवर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे तर सदरच्या कारवाईमुळे दुध भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.