अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारीजवळ डोके छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला.
सोहम उत्तम खिलारी (वय १०, रा. चिखली, जि. बुलडाणा, हल्ली वरखेड) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. सोहम हा गेल्या सात वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथेच वास्तव्यास होता.
दरम्यान, सोहमचा मृतदेह मंगळवारी सकाळी रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याच्या बाजूला छिन्नविच्छिन्न अवस्थेत लोकांना दिसून येताच या घटनेची माहिती लोकांनी नेवासे पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनस्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
दहा वर्षीय सोहम हा कधी कधी गावात भीकही मागायचा, अशी माहिती समोर आली. त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यासारखे नेमकी कोणी व कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचा उलगडा पोलिस तपासातून होणार आहे.
शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, नेवाशाचे निरीक्षक विजय करे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी पाहणी केली.
दहा वर्षांच्या बालकाची हत्या नेमक्या कोणत्या कारणास्तव झाली असेल, या कारणाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासाची सुई त्याच्याच कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांतील प्रमुख व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.