अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केली आहे. बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचे राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आले आहे. त्या आधारेच ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.
यासंबंधी हजारे यांनी पूर्वी तक्रार केली होती. जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर हजारे यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे.
कोणता कारखाना कोणाला विकायचा याचे आधीच नियोजन करून संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आला आहे,’ असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. ‘आम्हाला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही.
आता ईडीने जरंडेश्वर कारखान्यापासून सुरुवात केलीच आहे, तर त्यांनी तक्रारीत नमूद सर्व ४९ कारखान्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे. राज्य सहकारी बँकेच्या कारभारावर आरोप करताना हजारे म्हणाले, ‘या बँकेची अनेकदा चौकशी झाली आहे.
त्यात तथ्य आढळून आल्याने संचालकांवर जबाबदारीही निश्चित करण्यात आली होती. वसुलीही होणार होती. मात्र, सत्ताबदल झाला. हातात सत्ता आल्यावर काय होऊ शकते, ते आपण पहात आहोत.
आम्ही ज्या तक्रारी केल्या त्यात तथ्य नाही असे म्हणतात, तर मग तेव्हा हे संचालक मंडळ बरखास्त का झाले होते? यात कोणत्याही पक्षाला दोष द्यायचा नाही. सर्वांनी मिळून संगनमताने हा गैरव्यवहार केला आहे.
सहकारी साखर कारखाने बंद पाडून ते विकत घेतले. कोणाला कोणता कारखाना घ्यायचा हेही ठरवून झाले. ज्या महाराष्ट्रात सहकारी चळवळ सुरू झाली, रुजली, त्याच राज्यात हे सगळे घडल्याचे वाईट वाटते.
यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आता ईडीने कारवाई सुरू केलीच आहे, तर न थांबता सर्वच कारखान्यांवर केली जावी,’ असेही हजारे म्हणाले.