अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल आला आणि खूनाचे रहस्य उलगडले…

Published by
Ahmednagarlive24 Office

डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून 40 वर्षीय अनोळखी पुरूषाचा खून करण्यात आला. ही घटना अहमदनगर शहरातील बंगाल चौक ते धरती चौकाकडे जाणार्‍या रोडवरील श्रध्दा इमारतीसमोर रॅम्पजवळ 29 सप्टेंबर 2021 रोजी घडली होती.

पोलिसांनी यासंदर्भात तपास केला. मृत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवालातून त्याचा खून झाला असल्याचे समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अंमलदार वैशाली पठारे यांनी फिर्याद दिली आहे.

29 सप्टेंबर 2021 रोजी बंगाल चौक ते धरती चौक रोडवर 40 वर्षीय अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला.

सदर व्यक्तीला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. मृत व्यक्तीच्या डोक्याला अज्ञात इसमाने कठीण आणि बोथट वस्तूचा जसे की लाकडी दांडके याचा मार दिल्याने त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूस दुखापत झाली होती.

यामुळे तो बेशुद्ध होवून उपचारादरम्यान मयत झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान खूनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी खून झालेल्या व्यक्तीसह त्याला मारणार्‍या व्यक्तीचा तपास करण्याचे आव्हान कोतवाली पोलिसांसमोर आहे.

Ahmednagarlive24 Office