अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- रस्त्याच्या कामात दोन टक्के प्रमाणे आठ हजार रूपये लाच मागणी करून त्यातील पाच हजार रूपये स्वीकारताना पाथर्डी पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा शाखा अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
रामभाऊ दुधाराम राठोड (वय 53 रा. नाथनगर, पाथर्डी) असे पकडलेल्या अभियंत्याचे नाव आहे. नगरच्या लाचलुचपत विभागाने गुरूवारी ही कारवाई केली.
पाथर्डी तालुक्यातील तक्रारदार यांच्या मुलाने पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता दुरूस्ती कामाचा ठेका घेतला होता.
सदरचे काम पूर्ण झाल्याने त्या कामाचे चार लाखांचे बील मंजुरीकरीता जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी तसेच केलेल्या कामाच्या एम. बी रेकॉर्डवर सही करण्यासाठी शाखा अभियंता राठोड याने तक्रारदार यांच्याकडे बिलाचे रक्कमेच्या दोन टक्के प्रमाणे आठ हजार रूपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने लाच मागणी पडताळणी दरम्यान राठोड याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष आठ हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.
गुरूवारी पाथर्डी पंचायत समिती येथे तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रूपयांची लाच घेताना राठोड याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.