दनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर येथील बालकल्याण समितीच्या कार्यालयात 10 ते 15 जणांनी प्रवेश करून अध्यक्ष हनिफ मेहबुब शेख (वय 44 रा. मुकुंदनगर) यांना मारहाण करत त्यांच्यासह सदस्यांवर शाई फेकली.
सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. शेख यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झाल्यामध्ये कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष ईश्वर काळे, त्याची पत्नी, सून व त्यांच्या सोबतचे 10 ते 12 इसमांचा समावेश आहे. ईश्वर काळे याच्या युग प्रवर्तक प्रतिष्ठान संचलित यशोधरा मुला-मुलींचे वसतिगृह बारडगाव दगडी येथे आहे.
त्याठिकाणी 10 मुले अनाधिकाराने ठेवण्यात आली आहे. त्या वसतिगृहाला कुठलीच मान्यता नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. याच प्रकरणावरून काळे हा इतर साथीदारांना घेऊन सोमवारी बालकल्याण समिती येथे आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या इतर सहकार्यांना शिवीगाळ करून निळ्या रंगाची शाई फेकली.
तसेच त्याच्या पत्नीने फिर्यादी यांना मारहाण केली. तुम्ही आमच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नका व केलेली कारवाई मागे घ्या, नाही तर तुम्हाल जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच कार्यालयातील कागदपत्रे, फाईल फेकून देत तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे