अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्या शेतकर्यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोदराद घोषणाबाजी करुन नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
यामध्ये हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अॅड.कॉ.सुभाष लांडे, आर्किटेक अर्शद शेख, युनूस तांबटकर, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे,
किसान सभेचे धोंडीभाऊ सातपुते, सिंधूबाई त्रिमुखे, बाळासाहेब पवार, विष्णू म्हस्के, संध्या मेढे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, अब्दुल गनी शेख, भाऊसाहेब थोटे, रविंद्र फुलसौंदर, कार्तिक पासळकर, दिपक क्षीरसाठ, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, शाहीर कान्हू सुंबे, दिलीप घुले, शकील शेख आदी विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अॅड.कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, नव्याने पारीत करण्यात आलेले नवीन कृषी कायदे शेतकर्यांना देशोधडीस लावणारे आहे.
न्याय, हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या शेतकर्यांचे आंदोलनाला बदनाम करुन केंद्र सरकार दडपशाही करत आहे. रस्त्यावर बॅरिकेट, खिळे तर चक्क भिंत बांधून देशातील शेतकर्यांना रोखण्यासाठी एखाद्या सिमेसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. हे हुकुमशाहीचे दर्शन सरकारने घडविले आहे.
जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना, शेतकर्यांच्या प्रश्नासाठी केंद्र सरकार आडमुठेपणाचे धोरण सोडण्यास तयार नाही.
हे आंदोलन कोणत्या जाती, धर्म व पंथाचे नसून, देशातील शेतकर्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. महेबुब सय्यद यांनी अनेक शेतकर्यांचे बलिदान जाऊन देखील सरकारला जाग आली नसून, देशातील शेतकरी पेटून उठला आहे. केंद्र सरकार मात्र शेतकर्यांच्या संयमाचा अंत पाहत असल्याचे सांगितले.
अविनाश घुले यांनी देशातील शेतकर्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकर्यांचा हा उद्रेक आहे. हिंसक आंदोलन होण्यामागे केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका जबाबदार आहे. देशाच्या पोशिंद्यावर अन्यायाचा अतिरेक झाला असून, शेतकरी या अन्याया विरोधात क्रांती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. अर्शद शेख यांनी अन्याय, अत्याचार विरोधात आवाज उठवले तर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करते. देशद्रोहाची व्याख्या नेमकी तपासून घ्यावी लागणार आहे. या आंदोलनाने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात असल्याचे चुकीचे सांगितले जात आहे. या आंदोलनाने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला नसून, केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या मांडला. रास्तारोको करणार्या आंदोलक नेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रस्ता रहदारीस मोकळा करुन दिला.