अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर मालवाहू कंटेनर व ५० टन सिमेंट घेवून चाललेल्या मालवाहू टँकरची धडक होत भीषण विचित्र अपघात झाला.
या अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जावून धडकला, तर मालवाहू टँकर रस्त्यावर उलटला. या अपघातात कंटेनर चालक व घराजवळील महिला असे दोघेजण जखमी झाली. याबाबत अधिक माहिती अशी की,
संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर (एचआर ५५, एएफ ३५१५) व लोणीहून नाशिकच्या दिशेने ५० टन सिमेंट घेऊन चाललेल्या मालवाहू टँकरची (एमएच १३, सीयु ३५४९) धडक होत भीषण अपघात झाला.
या अपघातात मालवाहू टँकरची चार चाके धडीसहित निखळली. अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जाऊन धडकला, दरम्यान कंटेनर चालक कंटेनरमधून कागदपत्रांची फाईल घेऊन उडी मारून पसार झाला. तर या अपघातात मालवाहू टँकर चालक बाबू दाऊद शेख (रा. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला.
जखमीस संगमनेर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर घराजवळ उभी असलेली महिला विमल शंकर उपाध्ये (वय ५५) ही महिला देखील जखमी झाली. घरावर कंटेनर धडकल्याने शंकर उपाध्ये यांच्या घरातील पाच सदस्य बालंबाल बचावले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. लक्ष्मण औटी सहित पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.
तळेगाव दिघे चौफुली परिसर अपघातप्रवण बनला असून अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी या परिसरातील डांबरी रस्त्यावर गावादरम्यान गतीरोधक टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.