अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- महापालिकेतील आंदोलनादरम्यान शासन आदेशाचे उल्लंघन करणे, शासकीय सेवकास सार्वजनिक कार्य करण्यास अटकाव करणे,
पोलिसांना अरेरावी केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपावर आसूड मोर्चा काढला होता.
यावेळी आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आयुक्तांच्या दालनात जाण्यापासून अटकाव केल्यानंतर आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकरणी समाधान सोळंके यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस ठाण्यातून आलेल्या सूचनेनुसार मी महापालिका कार्यालयात पोलिस उपनिरीक्षक किरण सुरसे यांच्या मदतीसाठी बंदोबस्ताला गेलो होतो. किरण सुरसे हे आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलकांशी चर्चा करत होते.
त्यानंतर आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी ते दालनात गेल्यावर मी तसेच महिला पोलिस अंमलदार प्रिया भिंगारदिवे, अनिकेत आंधळे, सतिष त्रिभुवन, तन्वीर शेख तसेच नियत्रंण कक्षाकडील आरसीपी प्लॉटुनचे पोलिस अंमलदार आयुक्तांच्या दालनासमोर बंदोबस्तासाठी उभे होतो.
त्यावेळी आंदोलक किरण काळे, मनोज गुंदेचा, अनंत गारदे, मुबीन शेख, अन्वर सय्यद, प्रवीण गीते, सय्यद खलील, लोकेश बर्वे, नाथा आल्हाट, कौसर खान, जरीना पठाण, रिजवान शेख, निता बर्वे,
नलिनी गायकवाड व इतर कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोर आले व आम्हाला आयुक्तांना भेटायला जायचे आहे, आमच्यासोबतच्या महीलांनाही त्यांना भेटायला जायचे आहे. आम्हाला आतमध्ये सोडा असे किरण काळे यांनी मला सांगितले.
सुरसे साहेब आतमध्ये गेले आहेत, त्यांना बाहेर येवू द्या, ते काय सांगतात त्यानंतर आपल्याला सांगतो असे त्यांना मी सांगितले. सुरसे साहेब आयुक्त दालनातुन बाहेर आल्यानंतर आत सोडता येणार नाही, असे सांगितले.
आपण 5 महीलांना आतमध्ये चर्चेसाठी पाठवू. पण सर्वांनी आपले साहित्य बाहेर ठेवावे, असे आंदोलकांना सांगिल्यानंतर किरण काळे, प्रवीण गीते, गुंदेचा यांनी बळजबरीने आत जाण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही आमचा अपमान करत आहात, तुम्ही लोकांच्या ताटाखालचे मांजर आहात, तुम्हाला लाजा राहिलेल्या नाहीत, असे म्हणून त्यांनी पोलिस कर्मचार्यांशी हुज्जत घातली. कर्मचारी किरण काळे, प्रवीण गीते, मनोज गुंदेचा व इतरांना महानगरपालिकेच्या दरवाज्याबाहेर घेऊन आले.
तेथेही किरण काळे, प्रवीण गीते, मनोज गुंदेचा, अनंत गारदे यांनी पोलिसांसोबत आरेरावीची भाषा केली, असे सोळंके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार काळे, गुंदेचा यांच्यासह कार्यकत्यांविरोधात 143, 186, 188, 269 प्रमाणे तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.