अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील कौठा शिवारातील गट नंबर १५८ मधील विहीरीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत सापडले असून आरोग्य पथकाला घटनास्थळी जाईपर्यंत नवजात अर्भक गतप्राण झाले.
आरोग्य विभागाने त्यांस मृत घोषीत केले. या घटनेने कौठा चांदा परिसरात मोठी खळबळ उडाली असून या अमानुष घटनेचा पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
कौठा महालक्ष्मी हिवरा रोडववरील शिवारात गट नंबर १५८ मध्ये जमिन असलेले संभाजी बोरकर हे आपल्या ऊसाच्या शेतात पाणी धरण्यासाठी भल्या सकाळी गेले असता त्याच्या निर्दशनास ही बाब आली.
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनेची खबर सोनई पोलिस स्टेशन , आरोग्य विभाग तसेच गावातील प्रमुखांना दिली . अचानक समोर नवजात अर्भक दिसल्याने बोरकर घाबरुन गेले होते . गावात खबर मिळताच त्या ठिकाणी अनेकांनी धाव घेतली.
नुकतेच जन्मलेले हे स्त्री जातीचे गोंडस बाळ काही काळपर्यंत जीवंत होते. मात्र त्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. बाळाच्या डोक्याला मार लागल्यासारख्या काही खुणा दिसल्याचे प्रत्यक्षर्शी नी सांगितल्याने नेमक काय घडले असावे याचा प्रत्येक जण तर्कवितर्क लावत होता.
कुणीतरी अज्ञात व्यक्तीने ते टाकून दिल्याने या बाळाच्या डोक्याला मार लागल्याचे प्रथम दर्शीने पाहणाऱ्यांनी सागितले. सोनई पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पाठवले.
तोपर्यंत आरोग्य विभागाचे पथकही हजर झाले होते . आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी बाळाची पाहणी केली असता हे बाळ मृत घोषित करण्यात आले. पण सकाळी हे जीवंत असलेले बाळ मृत झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.
सदर अर्भक उत्तरीय तपासणीसाठी नेवासा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौठा गावात सदर घटना प्रथमच घडल्याने पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. हे बाळ रात्री की पहाटे या ठिकाणी टाकले. बाळ कोठून व कसे आणले.
या विषयी तर्क वितर्क काढले जात आहेत . याबाबत सोमई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून घटनेचा तपास बारकाईने केला जाईल.
यावेळी कौठा आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय कर्मचारी डॉ. दराडे, महिला सिस्टर, आंगणवाडी सेविका, पो. काॅ. तुपे, गावचे सरपंच मच्छिंद्र डाके अदि घटना स्थळी हजर होते.