अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदे तालुक्यातील माठ येथे सासऱ्याने सुनेवर अतिप्रसंग केला. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात सासू-सासऱ्यासह नंदावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासऱ्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली.
१० फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास सून घरात एकटी असताना सासरा लगट करू लागला. प्रतिकार केला असता तू ओरडू नकोस, तुझा आवाज ऐकून कोणीही मदतीसाठी येणार नाही, असे म्हणत त्याने बलात्कार केला.
कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई-वडिलांना ठार मारीन, असे सांगून तो निघून गेला. घाबरलेल्या सुनेने त्यामुळे कोणासही काही सांगितले नाही.
१६ फेब्रुवारीला तिने घडलेला प्रकार नवरा, सासू आणि नंदावा यांना सांगितला असता त्यांनीही कोणाला सांगू नकोस, आमची इज्जत घालवू नको, तुला त्रास होईल असे म्हणत झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला.
नंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सासऱ्याला मध्यरात्रीच अटक केली. अन्य दोन आरोपी फरार असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, हेड कॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे करत आहेत.