अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन कॉलनी, नवनागापूर येथील संघटीत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी १८ महिन्यांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
यामध्ये टोळी प्रमुख अजमुद्दीन उर्फ नूरा गुलाब सय्यद (वय ३०), कय्युम अकबर सय्यद (वय २८, दोघे रा.गजानन कॉलनी, नवनागापूर) तसेच संदीप अशोक कासार (वय २६,रा.वडगाव गुप्ता), सागर रावसाहेब चोथे (वय २२, रा.पितळे कॉलनी, नागापूर) यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींवर एमआयडीसी, भिंगार कॅम्प अशा पोलिस ठाण्यांमध्ये संघटीतपणे टोळी तयार करुन दरोडा टाकणे, विनयभंग करणे, मारहाण करणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी गंभीर स्वरुपाचे तब्बल १० गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या साहाय्यक पोलिस निरीक्षकांनी या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव ८ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या चौघांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत.