अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- शिर्डी येथे झालेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील आरोपी असलेला व कोरोना रजेमुळे जेलबाहेर असताना हत्येचा प्रयत्न करून फरार झालेला आरोपी विशाल कोते याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोते याने जेलमधून कोरोना रजेवर असताना शिर्डी येथील राजेंद्र भंडेरी यांना मागील भांडणाच्या कारणावरून कोयत्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते. याबाबत शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आरोपी विशाल कोतेचा शोध घेत होते, मात्र त्यांना तो गुंगारा देत होता.
आरोपी कोते हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याच्या शोधार्थ पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेले होते. निरीक्षक कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कोते शिरपूर (जि. धुळे) येथे लपून बसला आहे. पथक शिरपूर येथे गेले असता त्यांना माहिती, मिळाली की कोते तेथून शहादा व पुढे नंदूरबार येथे गेला आहे.
त्यानंतर पथकाने कोेतेचा नंदूरबार येथे शोध घेतला असता तो एसटी बसने मुंबई येथे जाण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पथकाने बसचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने आरोपी विशाल कोतेला ताब्यात घेतले. आरोपी विशाल कोते याच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात नऊ तर उमरी (जि. नांदेड) येथे एक असे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.