अहमदनगर ब्रेकिंग : हनी ट्रॅप प्रकरणात एक आरोपीला झाली अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या संदर्भात फरार असलेल्या आरोपी महेश बागले (रा. नालेगाव) याला आज नगर तालुका पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले आहे.

दरम्यान नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाचे 2 गुन्हे या अगोदरच दाखल आहेत. त्यातील हा आरोपी मिळून आला असून, अन्य एक जण फरार आहे. नगर तालुक्यामध्ये दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू होता.

त्यात एका अधिकाऱ्याला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सदरची महिला व तिचा साथीदार अमोल मोरे याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. त्यांना या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुद्धा पोलिसांनी सुरू केलेली होती. या प्रकरणामध्ये असलेला आरोपी बागले व खरमाळे हे दोन जण फरार होते.

आज नगर तालुक्यातील शहा डोंगर परिसरात एका लग्नासाठी येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने त्याठिकाणी महेश बागले याला पाठलाग करून पकडत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, नगर तालुक्यातील जखणगाव हनी ट्रॅपचा विषय सध्या सर्वत्र गाजत आहे. सुरुवातीला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संबंधित महिला व कायनेटिक चौक परिसरात राहणारा अमोल मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणांमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याच गुन्ह्याचा तपास करताना नगर तालुका पोलिस ठाण्यांमध्ये तीन कोटी रुपयांची खंडणी एका अधिकाऱ्याला मागितल्याप्रकरणी त्याने फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणांमध्ये संबंधित महिला व मोरे यांना वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये पोलिसांनी अर्जही दाखल केला होता. पण सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असल्यामुळे तो संपल्यानंतर त्यांना तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले जाणार आहे.

जो तीन कोटी रुपयांच्या गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये बागले हा फरार होता. त्याला आज अटक केल्यानंतर या घटनेचा उलगडा आता होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24