अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार – टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या स्कुटीला जोराची धडक दिल्याने संपदा सुरेश साळवे (वय २६) या पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कान्हूर पठार येथून वाळू वाहतूक करणारा मोकळा डंपर भारधाव वेगाने चालला होता. टाकळी ढोकेश्वर घाटात समोरून येणाऱ्या स्कुटीला भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोराची धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार समोरून दुचाकी आल्याचे चालकाच्या लक्षात आले, मात्र वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने डंपरने जोराची धडक दिली त्यात पत्रकार तरुणीचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात येऊन मृतदेह ताब्यात घेण्यात येऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.