अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा खून करून मृतदेह घरासमोरील अंगणामध्ये पुरून टाकला ! आता मिळाली हि शिक्षा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणार्‍या पतीला न्यायालयाने दोषीधरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रमेश चिमाजी जाधव (वय 50 रा. शिरापुर ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

रमेश व त्याची पत्नी हिराबाई शिरापूर शिवारात राहत होते. 22 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रमेश याने शिरापूर येथील राहत्या घरी हिराबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.

या मारहाणीत हिराबाई यांचा मृत्यू झाला. रमेश याने दुसर्‍या दिवशी सकाळी मयत हिराबाई यांचा मृतदेह घरासमोरील अंगणामध्ये खड्डा खोदून पुरून टाकला होता.

मयत हिराबाई यांचा भाऊ संतोष गुलाब वाघ यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रमेश चिमाजी जाधव याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पावसे यांनी करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे एकुण सात साक्षीदार तपासले गेले. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश पाटील यांनी आरोपी रमेश याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24