अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील समनापूरजवळील जेडगुले वस्तीपासून काही अंतरावर असणाऱ्या एका काटवनात पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे अर्भक कुणी टाकले त्या अज्ञात महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्तीवर राहणारे नाना चिमाजी जेडगुले हे आपल्या शेतामध्ये गेले असता त्यांना शेताच्या जवळील काटवानामध्ये एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.
त्यामुळे त्यांनी काटवनात डोकावून पाहिले असता त्यांना काटवनात कपड्यामध्ये गुंडाळलेल्या स्थितीत एक दिवस वय असलेले अर्भक दिसले. त्यानंतर त्यांनी त्या बाळास उचलून घेऊन घरी आणले.
घरातील महिलांनी त्यास आंघोळ घातली. अर्भक सापडल्याची माहिती समजताच अनेक जण घटनास्थळी आले. यावेळी राजेंद्र दिघे, तान्हाजी शिंदे, रावसाहेब शिंदे, सूर्यभान जेडगुले, साहेबराव सय्यद, आशा केंद्राच्या श्रीमती गायकवाड यांनी सहकार्य केले.
जेडगुले यांनी अर्भक सापडले असल्याची माहिती कामगार पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांना दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना दिली.
त्यांनी तात्काळ कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, राजेंद्र डोंगरे तसेच वनिता चोखले यांना घटनास्थळी जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. अर्भकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.