अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासणे येथे विहीरीत पडून बबन आण्णा शिंदे (वय ६०) यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की डोळासणे येथे बबन शिंदे राहात होते. शनिवारी ते आंघोळ करण्यासाठी विहिरीवर गेले होते.
बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहीरीत पडले होते. सोमवार दिनांक १७ मे रोजी काही महिला विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आला. काहींनी घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली.
त्यामुळे पोलिस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली व काही नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला.
याप्रकरणी उमेश शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो. नि. सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पो.हेडकॉन्सटेबल आदिनाथ गांधले हे करत आहेत.