अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली.
राजाराम शेळके यांचा खुन झाल्याने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान मयत शेळके यांच्यावर अद्यापही अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
दरम्यान ह्या हत्या प्रकरणात पोलिसांनी नारायण गव्हाणचा उपसरपंच राजेश शेळके यास तसेच कांडेकर परिवारातील काही सदस्यांना ताब्यात घेतले आहे.मुख्य संशयित राजेश शेळके हा नारायन गव्हाण गावचा विद्यमान उपसरपंच आहे.
राजाराम शेळके हा शुक्रवारी दुपारी त्यांच्या शेतात काम करत होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके एकटाच होता. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर मारेकर्यांनी हल्ला केला.
धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्याच्या मानेला गंभीर जखम झाली. त्याला तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.
पॅरोलवर असताना त्यांनी आपल्या शेतात काम चालू केले होते. शेळके यांचा आज झालेला खून म्हणजे बदला घेतल्याचाच प्रकार असल्याची चर्चा परिसरात झडत आहे.