अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार, पत्रकार बाळ बोठेला आज (गुरूवार) पारनेर न्यायालयाच्या कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधीश उमा बो-हाडे यांनी फरार घोषित केले.
त्यामुळे बोठेची मालमत्ता जप्त करुन त्याची कोंडी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.
बोठेला फरार घोषित करावे या मागणीचा अर्ज पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पारनेर न्यायालयात केला होता.या अर्जावर आज सुनावणी होऊन न्यायाधीश उमा बो-हाडे यांनी बोठेला फरार घोषित केले.
बोठेला फरार घोषित करण्यात आल्याने तपासी अधिकारी पाटील बोठेच्या मालमत्तेची,बॅंक खात्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर करतील व सदर मालमत्ता जप्त करण्याची तसेच बॅंक खाती सिल करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी करतील.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कारवाई करतील. बोठेला न्यायालयाने फरार घोषित केल्याने त्याची छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करणे,
त्याला पकडून देण्याचे आवाहन करणे ही प्रक्रिया आता पोलिसांकडून सुरू करण्यात येईल.त्यातून बोठेची कोंडी करणे शक्य होणार आहे.
बोठेचे काही व्यवसाय असतील तर ते सिल करणेही न्यायालयाच्या संमतीने शक्य होणार आहे.
मालमत्ता,व्यवसाय व बॅंके खाती सिल झाल्यास सगळीकडून आर्थिक कोंडी झालेला बोठे फार काळ फरार राहू शकणार नाही व त्याच्यासमोर पोलीसांना शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असा पोलीसांचा कयास आहे.