अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनाचा राज्यात हाहाकार दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले आहे. कोरोनामुळे येथे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
कोरोनाचे थैमान सुरु आहे. काही डॉक्टर त्यांच्या परीने सर्वोत्तम असे काम करत आहेत मात्र तरीही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अशीच एक घटना नगर शहरातील अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरातील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे, आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला ७२ वर्षीय करोना रुग्णावर उपचार सुरु होते. मात्र सदर रुग्ण ऑक्सिजन पाइप वारंवार काढून टाकत असे.
गुरुवारी रात्रीही त्याने ऑक्सिजन पाइप काढून टाकला. त्यामुळे प्रकृती खालावली आणि दुर्दैवाने काही वेळातच त्याचा मृत्यूही झाला. दरम्यान रुग्ण मृत झाल्याची ही माहिती आयसीयूमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी बाहेर जाऊन नातेवाईकांनी कळविली.
यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. त्यांना मारहाण केली आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली. आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर राहुल अरूण ठोकळ (वय२४ रा. सारोळा कासार, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी त्यांच्यासह प्रवीण गायकर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सविस्तर असे कि डॉ. ठोकळ यांनी रुग्णाचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांचा मुलगा पंकज तानाज गडाख (वय ३०) व त्याचा मावस भाऊ रोहन बाबासाहेब पवार (वय २१, दोघे रा. टाकळ काझी, नगर) यांना दिली.
रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगताच ते दोघेही चिडले. डॉक्टरांना शिवीगाळ करू लागले. डॉक्टर ठोकळ ओपीडीमध्ये आले. या दोघांनी तेथे येऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. उद्या सकाळी तुमच्याकडे पाहून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.
असे म्हणत आरोपींनी ओपीडीमध्ये तोडफोड केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे हॉस्पिटलमधून पोलिसांना माहिती देण्यात आली.
तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे आले. डॉ. ठोकळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.