अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- पाच दरोडेखोरांनी तीन पोलीस कर्मचार्यांवर हल्ला केल्याची घटना काल पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोटा परिसरातील माळवाडी येथे घडली.
पोलीस व ग्रामस्थांनी पाठलाग करून चार दरोडेखोरांना पकडले दरोडेखोरांनी एका पोलिसावर हल्ला केला. दगडफेकीत एक पोलीस व ग्रामस्थ जखमी झाला. घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी संजय विखे, गणेश लोंढे व किशोर लाड हे बोटा परिसरात मध्यरात्रीची गस्त घालण्याचे काम करत होते.
माळवाडी शिवारात त्यांना हे पाच दरोडेखोर आढळले. पोलिसांनी या दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. यावेळी दरोडेखोर व पोलीस यांच्यात झटापट झाली.एका दरोडेखोराने पोलीस नाईक गणेश लोंढे यांच्यावर सतूर या शस्त्राने वार केला या हल्ल्यात ते जखमी झाले.
ग्रामस्थांना याबाबत माहिती समजताच काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनीही दरोडेखोरांचा पाठलाग केल्याने दरोडेखोरांनी ग्रामस्थांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक ग्रामस्थ जखमी झाला. पोलीस व ग्रामस्थांनी चार दरोडेखोरांना पकडले.
या घटनेची फिर्याद पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून जानकु लिंबाजी दुधवडे (वय 22), संजय निवृत्ती दुधवडे दोघे राहणार गाढवलोळी,अकलापूर, तालुका संगमनेर,
राजू सुरेश खंडागळे वय25 रा. माळवाडी, बोटा, ता. संगमनेर, भाऊ लिंबा दुधवडे वय 25 वर्षे रा. गाढवलोळी, अकलापूर व एक अल्पवयीन यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 179/2021 भादंवि कलम 307,399,353,402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील भाऊ लिंबा दुधवडे हा दरोडेखोर पसार आहे.