अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना सहा जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करत एक लाखाची खंडणी मागितली. तसेच त्यातील दोघांनी त्यांच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी पिस्तुल लावून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येळपणे येथील खंडेश्वर कॉम्पुटर हे भावाचे दुकान बंद करून दि.७ सप्टेंबर रोजी संध्या. ८:३० वाजण्याच्या सुमारास घराकडे जात असताना येळपणे-पिसोरे रोडवरील मारुती मंदिराजवळ सिल्व्हर रंगाची बिगर नंबर असलेली इनोवा उभी होती.

त्या गाडीजवळ उभे असलेले सुनील उर्फ प्रेम रामदास जाधव व बबन भाऊसाहेब घावटे यांच्यासह चार ते सहा इसमांनी पत्रकार प्रमोद आहेर यांना अडवत तू आमचे लोकेशन पोलिसांना देतो, आमच्या बातम्या पेपरमध्ये छापतो, आम्हाला तू ओळखत नाही का? असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागले.

यावेळी काहींनी बियरच्या बाटल्या डोक्यावर, पाठीत मारत दोन अनोळखी इसमांनी डोक्याला पिस्तुल लावत आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने खिश्यात हात घालत रोख रक्कम सात हजार रुपये काढून घेत याला गाडीत टाका, याला तिकडे नेवून मारून टाकू असे म्हणत पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच तू पोलिसात तक्रार केली तर तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याची फिर्याद प्रमोद आहेर यांनी दिल्यावरून बेलवंडी पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पो नि. संपतराव शिंदे हे करीत आहेत.